दौरा बातमीपत्र – २

दौरा बातमीपत्र – २ – नागपूर !
रायपूरचा प्रयोग झाल्यावर अगदी वेळेवर धावत असलेल्या गीतांजली एक्सप्रेसमधे आपापल्या जागेवर झोपून सगळे नागपूरला आले. झोप अर्थातच लागली कारण जरा दमणूक झालेलीच होती.
मनात कुठेकुठे काहीबाही बोच वगैरे होतीच. म्हणजे प्रयोग तितकासा चांगला होऊ शकला नाही याची बोच.
पण मग नागपूरला आशिषचं घर हाच अड्डा असल्यामुळे प्रत्येकजण मनातून जरा जास्त रिलॅक्स होत गेलं. संध्याकाळ्पर्यंत सगळ्यांनी सलग झोप, आराम असे प्रकार उरकून घेऊन घेतले आणि संध्याकाळी सगळे खर्‍या अर्थाने प्रयोगासाठी तयार झाले होते. ताजेपणा आला होता. खरंतर रायपूरला जाण्यासाठी गीतांजली एक्सप्रेस चा पर्याय घेतला असता तर हा ताजेपणा रायपूरच्या प्रयोगाआधीही मिळाला असता .. पण गणपतीचा सण असताना त्याच्या आदल्या दिवशीच किंवा त्या दिवशी पहाटे निघून मग नाशिकला गाडी पकडणे हे पर्याय नकोसे होते. असो.
अशिषसाठी नागपूरचा प्रयोग महत्वाचा होता. एकतर त्याच्या बहिणीच्या मध्यस्थीने प्रयोग ठरला होता. शिवाय त्याच्या मूळ कॉलनीमधे प्रयोग असल्याने, “तिथून उठून अभिनयात करीअर करायला गेलेला, अग्निहोत्रमधे झळकलेला मुलगा” म्हणून स्थानिकांचं लक्षही त्याच्यावर केंद्रित असणार हे उघड होतं. अर्थात हे सगळं असं असल्यामुळे त्याला नि इतरांनाही सुखसोयींची कमतरता किंवा अधांतरीच असल्यागत वाटणार नव्हतं हे ही खरंच आहे.
तर प्रयोग सुरू झाला आणि पहिला अंक लोकांना आवडतच गेला. टाळ्या, हंशे आणि शिट्ट्यांचे आवाज सतत येत राहिले. आशिष लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत गेला. श्रद्धाचंही आजच्या प्रयोगात लक्ष नीट केंद्रित असल्याने त्या दोघांच्या प्रवेशांमधे मौज येत होती. प्रथमेश आणि प्राजक्ताला जरा एनर्जी कमीच पडत असावी असं वाटत होतं. दुसर्‍या अंकातला अदलाबदलचा प्रवेश आणि पहिल्या अंकातला बंबाबं चा प्रवेश हे दोन्हीही त्यामुळे जरा रेंगाळल्यासारखे वाटले. आज अभिषेक जरा बर्‍यापैकी काम करतोय असं दिसत होतं. मैथिली कालपासूनच मस्त आहे आणि तिने तसंच मस्त काम केलं … चिन्याला आज सूर मिळाला असावा अश्या खुशीत तो प्रयोगानंतर होता. कारण त्याचं कामही छानच झालं.
प्रयोग संपल्यावर लोकांनी खूप कौतूक केलं. “काय तुमची तयारी, काय तुमची एनर्जी, काय मस्त करता तुम्ही नाटक” वगैरे. आशिषचा सत्कार वगैरे करण्यात आला. आणि लगेचच आवराआवर करून सगळे नागपूर स्टेशनवर ११.४५ला च येऊन बसले. सुवर्णजयंती एक्सप्रेससुद्धा वेळेवर धावत होती आणि ती एक नंबर प्लॅटफॉर्मवरच येणार होती हा सगळा प्रकार एक नंबर होता.
सगळे खूप मस्त मूडमध्ये होते. नाटक मनात रुजल्याचं काहीतरी जाणवत होतं, एका चांगल्या प्रयोगानंतरचा समाधानी-थकवा होता .. पण आता उद्याचा दिवस आरामाचा आहे. अर्धा दिवस गाडीतच झोप काढता येणार आहे. मग संध्याकाळी “वाह ! ताज ..” चं दर्शन-सुख घेता येणार आहे आणि मग पुन्हा जोधपूरच्या वाटेवरच्या गाडीत झोप घेता येणार आहे.
त्यामुळे यापुढे या दौर्‍यातले प्रयोग अधिकाधिक चढत्या रंगाचे होतील हा विश्वास सगळ्यांच्या मनात आता आहे.

3 thoughts on “दौरा बातमीपत्र – २

यावर आपले मत नोंदवा