आनंद चाबुकस्वार आणि पीडीएचं शिबिर !

या वर्षीही या आमच्या मित्राचं शिबिरातलं सत्र फार वेगळ्या गंमतीचं झालं. फक्त फरक एव्हढा की ते यावर्षी खूपच लवकर, म्हणजे सातव्याच दिवशी म्हणजे १९ तारखेला झालं. आनंदच्या या शिबिरातल्या या सत्रांचं हे सलग सहावं वर्ष. माणूस, त्याचं अंतर्मन, त्याचे व्यवहार, त्यांचा सृजनशीलतेशी असलेला संबंध आणि खरंतर कलेच्या निर्मितीचा स्रोत जर मनाच्या अगदी थेट गाभ्यापाशी असेल तर कलेचा अस्वाद घेत घेत रसिक आणि केला सादर करत असलेला कलाकार यांच्यात एक वेगळंच नातं निर्माण होत जातं आणि मग अशी निर्मिती आणि आस्वादही आयुष्याला केवळ त्या क्षणापुरतं नव्हे तर दीर्घकाळपर्यंत काही आयाम प्राप्त करून देणारे ठरत जातात ह्या आणि अश्या मांडणीवर आनंदचं काम आधारलेलं आहे. यावर्षी स्वतःच्या शरीराचा आवाज ऐकणं आणि त्याच्याशी बोलणं अश्या अगदी वेगळ्या संकल्पनेतून सुरूवात करत आनंदने सर्वांना एका चांगल्या अर्थी बेचैन केलं आहे. शब्दात धरता येत नाही असा अवर्णनीय आनंद गवसल्याची नोंद सर्वच शिबिरार्थींच्या वह्यांमधे केली गेली आहे. आनंदच्या ह्या वेळच्या सत्राची ही काही चित्रं …..

झाडे – मातीच्या मनातील कविता

झाडेच्या तालमी उत्तम प्रकारे चालू आहेत. झाडे – मातीच्या मनातील कविता हा एक कवितांमधून स्फुरलेला रंगमंचीय अविष्कार असेल. साधारण एक तास आणि दहा मिनिटे इतक्या कालावधीचा हा कार्यक्रम झाडांचं आणि आपलं नातं आणि एकंदरीतच झाडांविषयी ‘’एक सजीव’’ म्हणून आपण जो काही संवेदनशील विचार करतो अथवा करत नाही आहोत त्याचा धांडोळा घेणारा ठरेल यात आता आम्हाला शंका नाही.

संहिता-संकलन – आनंद चाबुकस्वार

दिग्दर्शन / संगीत / प्रकाशयोजना – प्रदीप वैद्य

रंगमंचावर सहभागी कलाकार :

विनायक लेले, सायली सहस्रबुद्धे, संयोगिता पेंडसे, शचि जोशी, प्राजक्ता पाटील, अमृता वाणी, रूपाली भावे, प्रदीप वैद्य

निर्मिती सूत्रधार : शशिकांत कुलकर्णी

ही काही क्षणचित्रं .. ‘’झाडे .. ’’च्या तालमीमधली ..

झाडे – मातीच्या मनातील कविता : पुन्हा एकदा पीडीए कडून !

झाडे – मातीच्या मनातील कविता : पुन्हा एकदा पीडीए कडून !
आनंद चाबुकस्वार या आमच्या मित्राच्या डोक्यातली ही कल्पना .. मुळात हीच कल्पना .. की झाडं ह्या मातीच्या मनातून उमटणार्‍या कविताच .. हीच फार मस्त आहे.
आनंद चाबुकस्वार, रुपाली भावे, अनुपम बर्वे, अश्विनी गिरी आणि प्रदीप वैद्य हे पांच जण मंदार कुलकर्णी, वरुण वेंकिट आणि प्रणव परळीकर यांच्या मदतीने हा कार्यक्रम करीत असत. टॅक्ट – TACT  (टेंपररी अ‍ॅंड कंटेंपररी थियटर) या नावाने एक वेगळीच व्यवस्था या सगळ्यांनी मिळून केली होती.
मराठीत झाडांविषयक हज्जारो कविता आहेत. गेल्या शंभर वर्षांमधील अश्या हज्जारो  कवितांमधून आनंद चाबुकस्वार ने ५१ कविता निवडून या कार्यक्रमाची संहिता तयार केली आहे. झाडे आणि आपण यांच्यातल्या परस्पर नात्या-गोत्यांचा हा एक धांडोळाच म्हणता येईल ..
सध्या पीडीएचे कलाकार या कार्यक्रमाच्या नवीन आवृत्तीची तालीम करत आहेत.
साधारण त्याच सूत्राप्रमाणे पण आपले वेगळेपण जपत आम्ही हा कार्यक्रम पुन्हा रचत आहोत.
४ ऑक्टोबर ला याची रंगीत तालीम असून .. त्यानंतर काही कलाकारांच्या परीक्षा असल्यामुळे या कार्यक्रमाच्या नवीन अवताराचा पहिला प्रयोग असेल ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात !
याबद्दल अधिक माहिती इथे देत राहूच …