सुरू …

अखेरीस काल ठीक पांच वाजता, पीडीएचं वार्षिक नाट्य-शिक्षण शिबिर क्र. २० सुरू झालं. हो नाही म्हणता म्हणता काहीतरी घडामोडींच्या योगाने, सेवासदन इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा एरंडवणे येथील इमारतीतला आमचा गेल्या काही वर्षांपासून लाडका झालेला तोच हॉल या शिबिरासाठी उपलब्धही झाला. 

२३ शिबिरार्थींनी काल आपल्या अभ्यासक्रमाला सुरूवात केली. आता रोज ठीक पांच ते रात्री ९.३० पर्यंत एका धमाल वातावरणात ही सगळी मंडळी रमतील. मन आणि शरीर यांना विलक्षण ताण देणार्‍या तर कधी विलक्षण मोकळं करणार्‍या गोष्टी करतील. 

या वर्षी शिबिरात जास्तीचे मिळालेले दोन दिवस, म्हणजे त्यांचे नऊ तास वेगवेगळ्या दिवशी विभागून घेऊन एखाद्या नाट्यबीजाचा संहिता ते प्रयोग हा प्रवास कसा होत जातो हे प्रत्यक्षपणे शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिवाय प्रभाकर भावे (रंगभूषा), आनंद चाबुकस्वार आणि मोहित टाकळकर यांनाही बोलावलं आहेच .. विशेष असं की गेली काही वर्षं अनिरुद्ध खुटवड हा आमचा अत्यंत हुशार दिग्दर्शक मित्र या शिबिरासाठी काही ना काही कारणाने येऊ शकत नव्हता .. तर या वर्षी तोही उपलब्ध होणार असं दिसतंय.

गेल्या दोन वर्षांमधे निरंजन गोखलेने अचानक शिबिराच्या दिवशी अमेरिकेतून इथे प्रकट होऊन शारीरिक आणि त्या अंगाने जाणारे मानसिक व्यायाम, कसरती इत्यादिंची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली होती .. शिबिराला या आताच्या नव्या वाटेवर आणण्यामधे निरंजनचा महत्वाचा सहभाग आणि वाटा आहेच. मंदार कुलकर्णी किंवा मंकु ने हे शिबिर पूर्वी केलंय त्यानंतरच तो ललित कला केंद्राच्या मार्गाने नाट्य-चळवळ्याचा नाट्य-कर्मी झाला आहे. निरंजनच्या या कामात त्याने आजवर त्याला आणि शिबिराला मस्त साथ दिली आहे. या वर्षी तो असेल पण निरंजन मात्र अमेरिकेतून रोज चॅटवरून काही ना काही सुचवत सुचवत या शिबिरात मनाने कायम सहभागी असेल. या सगळयाचा फायदा प्रदीपदादाचं वजन कमी व्हायला नक्कीच होईल कारण या दोघांच्या अनुपस्थितीत प्रदीपदादाने काल हे व्यायामांचं सत्र घेतलं.. नुसते शारीरिक नाही तर त्याच वेळी मनाला ताण देणारे व्यायाम करताना शिबिरार्थींची (आणि प्र.दा.ची ही) बर्‍यापैकी दमणूक झाली. पण गंमत तसूभरही कमी झाली नाही.

आज वह्या लिहिल्या गेल्या असतील, जात असतील किंवा सेवासदनमधे लवकर येऊन लिहिल्या जातील. चहाच्या वेळेत नवीन नवीन मैत्र्यांचे धागे जुळत जातील. एकमेकांना घरी सोडणे, किंवा घरून आणणे इत्यादी बंध निर्माण होऊ लागतील. २३ दिवसांचं शिबिर आणी २४ व्या दिवशीचं सादरीकरण … आणि मग काही बंध त्यानंतरही दृढच राहातील. काही बंधांना अधिक अर्थ प्राप्त होतील किंवा नव्या दिशा मिळतील .. एकंदरीत आजवर ज्यांचे चेहरीही माहित नव्हते अश्या माणसांचं एकमेकांच्या विश्वातच नाही तर भावविश्वात पदार्पण होईल.

आणि मग नेहेमीप्रमाणे शिबिराच्या दरम्यान संध्याकाळी वादळी वळीवाचा पाऊस होईल. मुलांना आणि आम्हाला मिळालेलं हे सरप्राइज, गरम चहा आणि ताजा वडापाव यांच्या रूपात साजरं केलं जाईल … एकंदर मजेची ही पर्वणी आता २३ दिवस अशीच मस्त चालेल !

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s