धैर्याची गोड फळं !

१९ ऑक्टोबर हा पीडीए चा वर्धापन दिन ! त्यात २०१० चा हा वर्धापन दिन चक्क ५९ वा वर्धापन दिन. पीडीए ने साठाव्या वर्षात पदार्पण केलं. ह्यावेळेला हा दिवस उल्हासात साजरा करत हे व्हावं अशी आमच्या “श.कु.” काकांची खूप इच्छा होती. (माहिती नसलेल्यांसाठी – श.कु. म्हणजे शशिकांत कुलकर्णी)

गणेशोत्सवात सादर केलेलं सख्खे शेजारी हे नाटक म्हणजे करमणूकीचा खजिनाच ! त्यामुळे हे नाटक आपण सादर करू असं त्यांच्या मनात फार होतं. अर्थातच सर्व कलाकारांना गम्मत येते असं नाटक पुन्हा पुन्हा व्हावं असं वाटत राहातं तसं सख्खे शेजारीच्या आमच्या कलाकारांना (म्हणजे रंगमंच /प्रयोग व्यवस्थेतील पडद्यामागच्या कलाकारांसहित) हा प्रयोग जरूर व्हावा असंच वाटत होतं.

पण ह्या प्रयोगासमोरही अनंत अडचणी होत्याच.

शकुकाका पोलंड दौर्‍यावरून परत आले तीन ऑक्टोबर ला आणि ह्या प्रयोगाच्या हालचाली खर्‍या अर्थाने सुरू झाल्या.

दरम्यानच्या काळात दिग्दर्शक प्रदीप हा “नेक्रोपोलिस” आणि “तिची सतरा प्रकरणे” ह्या नाटकांच्या तालमी तसंच, “जंगलनामा” च्या दिल्ली दौर्‍यासाठी जाणं (आणि त्या नाटकांच्या काही अडचणींमुळे – आत्ताच जाणं ..) आवश्यक होऊन बसलं होतं. त्यामुळे प्रदीप पुन्हा एकदा सख्खेच्या प्रयोगाला नाही म्हणून नटमंडळी चिडू लागली. (किंवा रुसू लागली म्हणूया ..) त्यातच काही नटांच्या परिक्षा सुरू झाल्या किंवा होणार आहेत हे जाहीर झालं .. आणि या सगळ्यावर कडी झाली ती साधारणपणे बारा तारखेच्या सुमारास हे (पक्कं) कळलं तेव्हा .. की श्रद्धा देशपांडे हा प्रयोग करू शकत नाही आहे. वास्तविक .. मूळ नटसंचात काही माफक तालमी होऊन प्रयोग चांगला होईल हा आत्मविश्वास आम्हाला होता .. चिकी (ऊर्फ विक्रांत ठकार ) याची साभिमान ईजिप्त देश यात्रा (झिम्मड साठी) ही सुद्धा याच दरम्यान आली होती .. त्यामुळे दौर्‍यात लक्षात आलेल्या तांत्रिक तृटी दूर करण्याचं कामही नवीन हातांमधेच देणं भाग होऊन बसलं होतं. श्रद्धा ललित कला केंद्रात शिकलेली आणि भूमिका समजेने करत असलेली, नाटकातली फार महत्वाची अभिनेत्री होती .. पण ती आता नसणार .. मग दोन पर्याय होते .. एक तर १९ तारखेचा प्रयोग रद्द करणं किंवा मग श्रद्धा ऐवजी कोणीतरी ती भूमिका करणं .. ह्यानंतरच्या सर्व घुसळणीतून आम्ही सगळे गेल्यावर आमची गीतांजली जोशी ही ती भूमिका करणार हे नक्की झालं आणि सर्वांना हायसं वाटलं.

पण तिच्यापुढे दिव्य वाढून ठेवलं होतं. केवळ सात दिवसांपैकी पांचच दिवसांत तिला हे काम उभं करायचं होतं. तिची रेडिओ चॅनलवरची नोकरी (ह्या सणासुदीच्या मोसमात) सांभाळत हे करणं हे काही वेळा सगळ्यांचा थरकाप करणारं नक्कीच होतं.

पण ती उभी राहिली. त्या दिवशी प्रयोगाची परिणामकारकता तिच्या विशिष्ठ दिसण्यामुळे आणि भूमिकेचा बाज नीट पकडता आल्यामुळे उत्तमच राहिली असा एकंदर वृत्तांत आहे.

प्रयोग मुळात कमी तालमी आणि ज्या झाल्या त्या ह्या परिस्थितीत झाल्याने अगदी सर्वोत्तम वगैरे होऊ शकणं अभिप्रेत नव्हतं .. पण नेटका झाला .. (तांत्रिक घोळ होतेच ..)

आम्हाला हा प्रयोग झाल्या त्यापेक्षा चांगला होऊ शकला असता ही हुरहुर जरी लागली असली .. तरीही तो पीडीएच्या खूप खूप शुभचिंतकांच्या उपस्थितीत झाला हे महत्वाचं वाटत आहे.

हा लेख ह्यासाठी सफाई वगैरे देणारा लेख नाही ..

उलट आज साठाव्या वर्षात पदार्पण करताना .. पीडीएकडे अशी काही मंडळी अद्याप आहेत आणि नव्याने तयार होत आहेत की ज्यांना प्रतिकूल परिस्थितीत पीडीएची मान मरगळून जाता कामा नये ही ईर्षा मनात आहे.

सब्र का फल मीठा असं आपण म्हणतो .. धीरानं घेतलं की त्या धीराची गोड फळं चाखता येतात हा पायंडा आहेच ..

इथे असं झालं की आधी म्हणालेल्या ईर्षेमुळे धैर्यानं या परिस्थितीला शिंगावर घेतलं .. विशेषत: स्मिता, आशिष, काका आणि गीतांजली ने .. सोबत अमृता आणि इतर नटमंडळी होतीच ..
पण ह्या धैर्याची फळं गोड मिळाली हे उत्तम ..

पीडीएच्या साठा उत्तराची कहाणी सुरू झाली आहे .. अगदी हसत खेळत आणि .. ती मनात होती त्या प्रकारे सुरू करू शकल्याचं स्मित शकुंच्या चेहर्‍यावर घेऊन …

ही कहाणी या वर्षी नाट्यक्षेत्रातल्या इतर अनेकांच्या चेहर्‍यांवर स्मित फुलवण्यासाठी समृद्ध होत जाईल .. नक्कीच !

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s