पी डी ए चं दौर्‍याचं नाटक !

पी डी ए च्या स्थापनेपासून आजपर्यंत चालू असलेली ही एक महत्वाची गोष्ट. म्हणजे यातही खूप बदल होत गेले आहेत. पण महाराष्ट्राबाहेर राहाणार्‍या मराठी रसिकांसाठी पीडीए दरवर्षी एक ना एक नाटक सादर करत आली आहे. हे नाटक प्रामुख्याने मनोरंजक असं आणि इथे व्यावसायिक रंगभूमीवर बरीच लोकप्रियता मिळवलेलं असतं.

पूर्वी जेव्हा प्रायोगिक नाटक हेही फ़्लॅट सेट वर होऊ लागलं होतं तेव्हापासून लोकप्रियता कधीच न आटलेलं प्रेमा तुझा रंग कसा?” हे नाटक पीडीए ने या पद्धतीने अगदी अलिकडच्या काळापर्यंत .. म्हणजे अगदी २००५०६ पर्यंत सादर केलं आहे. हे प्रयोग प्रमुख्याने गणेशोत्सव, कोजागिरी पोर्णिमा किंवा स्थानिक महाराष्ट्र मंडळाच्या एखाद्या महत्वाच्या समरंभाच्या निमित्ताने होत असतात.

प्रेमा तुझा रंग कसा?, जोशी काय बोलतील?, वटवट सावित्री, घेतलं शिंगावर, जावई माझा भला, आपलं बुवा असं आहे, ही नाटकं विशेष लोकप्रिय आहेत आणि सर्वाधिक वेळा सादर झाली आहेत. संगीत संशयकल्लोळ आणि संगीत मीरा मधुरा ही संगीत नाटकंही तशी बर्‍यापैकी वरच्या स्थानावर होती.

या नाटकांच्या बाबत एक मौज आम्ही .. म्हणजे पीडीएत नव्याने आलेल्या सगळ्यांनी अनुभवली आहे. महाराष्ट्राबाहेर पूर्वी स्थायिक झालेल्या मराठी रसिकांना ज्या पद्धतीची नाटकं किंवा जसं रंजन आवडतं ते सर्व या नाटकांमधे भरपूर प्रमाणात असतं ! पण आपण इथे राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलेलं एखादं नाटक तिकडे सादर करू आणि महाराष्ट्राबाहेरच्या रसिकांची दाद मिळवू असं स्वप्न घेऊन तिकडे गेलो तर मात्र आपण दुहेरी त्रास करून बसतो. एक त्रास आपल्याला .. तो असा की महोत्सवी वातावरणात बहुतांश व्यक्ती या निखळ हसण्यासाठी तिथे आलेल्या असतात. त्यासाठीच त्या व्यक्ती सदस्यत्वाचे पैसे वगैरे भरत असतात. त्यांचा आपण अक्षरश: भ्रमनिरास करतो आणि ते बिच्चारे खजिल होऊन पैसे वसूल न झाल्याच्या दु:खात बुडलेले आपण पाहातो. आणि दुसरा त्रास तिथल्या आपल्या समर्थकांना .. (हा शब्द जरा राजकीय आहे .. पण तसंच ते सगळं होऊन बसतं) .. तो त्रास असा .. की तिथले सभासद मग त्यांच्याकडे जरा संशयाने पाहू लागतात. का बरं यांनी या ग्रूपला बोलावलं .. असं .. म्हणजे मग त्यांच्याकरता तो त्या वर्षात सतत डोकं वर काढणारा त्रास होऊन बसतो .. त्यांच्या कार्यकारिणीत, निवडणुकांमधे त्यांच्या विरुद्ध वापरलं जाऊ शकेल असं एक अस्त्रच आपण इतरांना देतो.

असो.

हे सगळं जरी बहुतांश ठिकाणी असं असलं तरी .. हैद्राबाद, जमशेदपूर, कोलकाता, जयपूर, बंगलोर, चेन्नई अशी काही मंडळं आम्हाला दिसली आहेत की जिथले पदाधिकारी बहुतांशवेळा नवीन काही करून पहायला तयार होते. २००० सालापासून एक जरा असा विचार केला जाऊ लागला .. म्हणजे आमच्याकडून .. की आपली उत्कृष्ट अशी नाटकं महाराष्ट्र मंडळांच्या सहाय्याने तिकडे नेऊ .. तिथल्या प्रेक्षकांना नवीन काही दाखवू .. पण या सगळ्याच्या आड येऊ लागली ती असं करण्यामधे असलेली तंत्र आणि पर्यायाने पैशांची व्यवस्था. मग काही चटके सोसलेच या एका साध्या अपेक्षेपोटी.

कोलकाता आणि जमशेदपूरला २००१२००२ च्या सुमारास सादर केलेले नाणेफेक या नाटकाचे प्रयोग हे या अर्थाने दु:स्वप्नच ठरले. मोहित टाकळकरने दिग्दर्शित केलेलं हे नाटक इथे खूपच यशस्वी झालं होतं .. अनेकांनी स्तुती केली होती त्याची. चं.प्र.देशपांड्यांचं हे एक उत्तम नाटक आहे. पण त्यात असलेला बुद्धीनिष्ट विनोद आणि बौद्धिक पेच यात कोणालाच रस नव्हता .. प्रेक्षकांची नि आमची वेवलेंथ कधीच जुळली नाही .. एक क्षणही नाही .. पळून जावं असं वाटावं असे प्रयोग ! पण त्याआधीच्या वर्षी ययाती हे गिरिश कार्नाडांचं नाटक मात्र याच ठिकाणी प्रेक्षकांना आवडलं होतं. खरंतर ययातीच्या पारंपरिक कथेशी फारकत घेणारं हे नाटक, पण ते मात्र प्रेक्षकांना आवडलं. ययाती नाटकात जे नाट्य होतं ते आणि नाणेफेक या नाटकातलं नाट्य हे मात्र एकमेकांपासून अगदीच भिन्न. असो .. त्यानंतर दौरे हा विषय एकदोन वर्षं बंद झाला. पण पुन्हा विचारणा होऊ लागली आणि दौरे पुन्हा सुरू झाले.

१९९५९७ पासून ते अगदी २००२ पर्यंत पूर्वेकडे प्रयाण हे ठरलेलं होतं. कोलकाता आणि जमशेदपूर ही दौर्‍याची दोन निमंत्रणं ठरलेली असायची. आता दिशा बदलली आहे. पश्चिम ही ठरऊन गेली आहे. गेली तीनचार वर्षं जयपूर, जोधपूर आणि अजमेर ही ठिकाणं अगदी पक्कीच केली आहेत पीडीएच्या कलाकारांनी !

नव्या संचातलं जावई माझा भला, आपलं बुवा असं आहे आणि गेल्या वर्षी सादर केलेलं एका लग्नाची गोष्ट या नाटकांसाठी या विश्वासाची पायाभरणी केली ती त्यांच्या आधी जयपूरला रविंद्र भारतीमधे सादर केलेल्या नांदा सौख्यभरे या तुफान विनोदी झकास प्रयोगाने. नांदा सौख्यभरे त्यावर्षी जयपूरला झालं तसंच जमशेदपूरलाही झालं.

हे दौरे हे फारच मस्त असतात. रेल्वेचा दिवसादिवसांचा प्रवास आणि त्यातले वेगवेगळे अनुभव सर्वच कलाकारांना समृद्ध करतात !

१९९५ च्या दौर्‍यात दिल्लीहून परत येताना आग्रा स्टेशनवर अर्धे कलाकार दिवसभर अडकून पडले होते आणि अर्धे दिल्लीहून सुटलेल्या नि पुण्याकडे निघालेल्या पण राजा की मंडी स्टेशनवर अडकून पडलेल्या गाडीत ! पुढे एकदा कोलकाता दौर्‍यात पूरपरिस्थितीमुळे महाराष्ट्र मंडळापासूनच अ‍ॅड्व्हेंचर टूर निघाल्याप्रमाणे कंबरभर पाण्यातून कसेतरी हावडा स्टेशन ला येऊन पोहोचल्यावर जवळजवळ दोन दिवस हावडा स्टेशनवरच बसून काढावे लागले होते.

अर्थात असे अडकण्याचे प्रकार तसे अपवादानेच घडले आहेत. एकदा बंगलोर दौर्‍यानंतर परतताना मोहन बापट (बापटकाका) हे काही कारणाने गाडी पकडू शकले नाहीत. आम्ही सगळे रेल्वेने परत आलो आणि मग बापटकाका जे एस.टी. महामंडळात काम करतात, ते मग बस स्टॅंडवर गेले आणि चक्क एस.टी. ने पुण्याला आले !

दौर्‍यांमधे काही ओळखी फार पक्क्या होतात .. म्हणजे स्थानिक मराठी लोक, आवर्जून दाद देणारे काही चेहरे, पदाधिकारी, दरवर्षी आवर्जून काही ना काही स्वरूपाचा त्रास देणारेही काही चेहरे असतात ते चेहरे ! असं सगळंच !

एखाद्या महाराष्ट्र मंडळाच्या व्यवस्थापनात होत जाणारे चांगले बदल सुखावणारे असतात पण कधीतरी कुठेतरी घटत चाललेली प्रेक्षक/सदस्य संख्या नि त्याचबरोबर आयोजनात येत चाललेली मरगळ हे ही दिसतं .. मग वेदना होतात. हळहळ होते.

आता महाराष्ट्र मंडळांची गणेशोत्सवांची तयारी सुरू झाली असेल. या वर्षी आम्ही बेतलंय सई परांजपे लिखित सख्खे शेजारी ! आमची पत्रं विविध महाराष्ट्र मंडळांचे पदाधिकारी घेऊन बसले असतील. त्यावर चर्चा होत असतील. .कु.काका फोन वर फोन करत असतील. आणि आमचा या वर्षीचा गणपती दौरा आकार घेऊ लागला असेल !

कुठे, कधी प्रयोग आहेत ? दौरा कसा कसा होणार आहे ? कोण कोण जाणार आहे ? याची उत्सुकता आता आम्हाला खाते आहे. (तुम्हालाही कदाचित ..) पण या सगळ्याची उत्तरं उलगडत जाणं हे ही या दौर्‍यांमधलं काहीतरी आहे .. जे आम्हाला सततच रोमांचक वाटत आलं आहे !

राजस्तान दौर्‍यावरचं एका लग्नाची गोष्टचं नेपथ्य

कशाही परिस्थितीत प्रयोग रंगवायचा कसा याचं शिक्षण कलाकारांना मिळतं !

प्रेक्षकांना नाटक आवडू लागलं की नाटक मस्त रंगत जातं !

Advertisements

6 thoughts on “पी डी ए चं दौर्‍याचं नाटक !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s