पीडीएच्या शिबिराचा समारोप !

वीस वर्षं .. वीस समारोपाचे दिवस .. पण वातावरण तितकंच (किंवा कांकणभर जास्त) भावनिक झालेलं … आणि मग ९.३० च्या सुमारास डोळ्यातले अश्रू पुसत, किंवा मस्त दिलखुलास हसत घेतलेल्या निरोपांचे तेच भारलेले क्षण ! काल म्हणजे ५ जून २०११ ला सुदर्शन रंगमंचावर पूर्ण भरलेल्या सभागृहासमोर पीडीएच्या नव्या प्रशिक्षणार्थींचे चार नाट्यप्रवेश सादर झाले. या प्रवेशांमधे भाग घेतलेले जवळजवळ सर्वचजण रंगमंचावर प्रथमच पाऊल ठेवत होते. काहींनी फार वर्षांपूर्वी बालनाट्यात घेतलेल्या सहभागानंतर थेट आज पुन्हा रंगमंचावरचा प्रकाश अंगावर झेलला होता .. आणि ह्या नाट्यप्रवेशांची आणखी एक गंमत अशी होती की हे प्रवेश या नव्या कलाकारांना हाताशी घेऊन त्यांच्या दिग्दर्शकांनी केवळ पाच दिवसात बसवले होते. ज्यांनी ती पाहिले त्यांनी भरभरून शाबासकी दिली. पण ज्यांनी ते पाहिले नाही त्यांच्यासाठी इथे काही क्षणचित्रंही देत आहोत.

हे नाट्यप्रवेश गेल्या चार वर्षांपासून थेट नाटकाच्या सादरीकरणाची चुणूक शिबिरार्थींना मिळावी म्हणून बसवायला सुरूवात केली गेली. म्हणजे हा जो कालचा समारंभ होता, तो या सादरीकरणांच्या कालावधीपर्यंत त्यांच्या शिक्षणाचाच भाग होता हे आता इथे सांगायला हरकत नाही. प्रशिक्षणासाठी एखाद्या नाट्य-प्रशिक्षण संस्थेमधे अथवा विद्यापीठात जे केलं जातं ते सर्व इथे, पीडीएमधे केलं जातंच पण त्यात पीडीएने गेल्या अनेक वर्षांमधे कमावलेल्या उत्तम व्यवस्थापन कौशल्यांचा आणि ते साकारणार्‍या आमच्या सगळ्या सदस्यांचाही कस इथे लागत असतो. प्रसंगानुरूप वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य, प्रकाश (आणि संगीतही) हे सर्व वेळच्यावेळी, म्हणजे एकतर तालमींच्या एकंदर पांच दिवसांपैकी जवळपास शेवटच्या एक-दोन दिवसातच जागच्याजागी उपलब्ध करून देणं ही एक कमालच असते. प्रेक्षकांचा फार वेळ न खाता काही क्षणात पुढल्या प्रवेशासाठी सर्व सिद्धता सुदर्शनमधे करून दिली जात असते. यातूनच पीडीएची अफलातून बॅकस्टेज टीम तयार होत गेली आहे. स्मिता तावरे, अमृता वाणी, प्राजक्ता पाटील, प्रवीण निडगुंडे, रूपाली भावे, विक्रांत ठकार ही सर्व मंडळी ही सर्व जय्यत तयारी करण्यात आणि शिबिरार्थींना तयार करण्यात गुंतली होती .. दुपारी तीन वाजल्यापासून अगदी थेट समारंभ संपल्यावरही त्यांचं काम चालूच होतं.

काल पहिला प्रवेश सादर झाला तो आचार्य अत्रे यांच्या भ्रमाचा भोपळा या नाटकावर आधारित होता. अत्र्यांची भाषा आणि त्यातला गडगडाटी विनोद एक शिबिर केल्यावर शेवटच्या पाच दिवसांच्या तालमींच्या भांडवलावर पेलणं हे महा-आव्हान या संघाने चांगलंच पेललं. तरूण पिढीतल्या प्रेक्षकांनी काही विनोद तर अक्षरशः डोक्यावर घेतले. निखिल देव आणि सागर यार्दी या दोघांनी या प्रवेशाचं दिग्दर्शन केलं होतं

भ्रमाचा भोपळा १

भ्रमाचा भोपळा २

भ्रमाचा भोपळा ३

भ्रमाचा भोपळा ४

भ्रमाचा भोपळा ५

भ्रमाचा भोपळा ६

भ्रमाचा भोपळा ७

दुसरा प्रवेश सादर केला गेला तो होता “एक लिअर असा !” ह्या मधे विंदा करंदीकर यांनी शेक्सपिअरच्या किंग लिअरचं जे मराठी भाषांतर केलं आहे, त्यातील काही स्वगतांसहित एका ज्येष्ठ नाट्यकलावंताच्या भ्रमिष्ठपणासोबत, त्याच्या मुलीने त्याचा घेतलेला शोध असं कथानक होतं. प्रदीप वैद्य यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या प्रवेशात अभिनयावर कलाकारांनी घेतलेली मेहनत आणि अगदी छोट्यातछोटे बारकावेही न सोडता केलेला नैसर्गिक अभिनय ही वैशिष्ठ्ये होती.

एक लिअर… १

एक लिअर… २

एक लिअर… ३

एक लिअर… ४

एक लिअर… ५

एक लिअर… ६

एक लिअर… ७

अनिल बर्वे हे व्यावसायिक रंगभूमीला अतिशय वेगळ्या धाटणीची समर्थ नाटकं देणार्‍या लेखकाचं नाव. अलिकडे त्यांचं हमीदाबाईची कोठी हे नाटक पुन्हा रंगमंचावर आलं आहे. त्याचं आणखी एक नाटक “ मी स्वामी या देहाचा ..” चक्क इच्छामरण या विषयावर होतं आणि ते जवळपास वीस वर्षांपूर्वी व्यावसायिक रंगभूमीवर सादर होत होतं. या नाटकातल्या प्रवेशावर आधारित तिसरं सादरीकरण संहितेची उत्तम बांधीव रचना आणि त्यामधे मांडलेले या विषयाशी संबंधित विविध प्रश्न लोकांसमोर संयत पण प्रभावीपणे सादर करणार्‍या या नवीन कलाकारांमुळे चांगलंच वठलं ! दिग्दर्शक अशिष वझे.

मी स्वामी … १

मी स्वामी …२

मी स्वामी … ३

मी स्वामी … ४

मी स्वामी … ५

मी स्वामी … ६

मी स्वामी … ७

यावर्षीच्या प्रवेशनिवडीचं वैशिष्ठ्य असं की सर्व विविध प्रकारचे प्रवेश यावर्षी होते. जुनं, विनोदी, भाषेचं सौंदर्य जपणारं, लयबद्ध संवाद असलेलं, थोडं भास-आभासांचं नाट्य, काहीसं जुन्या पण ठाशीव रचनेचं, उत्तम संवादात्मक रचनेचं या सर्वांसोबतच अगदी आजचं, प्रायोगिक रंगभूमीवरचं आजच्या जीवनाचा शोध घेणारं असही त्यात होतं .. सागर देशमुख ह्या पीडीएच्या शिबिरातच आपली नाट्यवाटचाल सुरू केलेल्या तरूण लेखकाचं तळ्यात मळ्यात हे नाटक रुपाली भावेने दिग्दर्शित केलं होतं .. ही एकांकिका पस्तीस मिनिटं दोनच कलाकारांमधे सादर होते .. हे एव्हढंच नाही तर त्यातले सर्व बारकावे टिपत, ते सादर करत पुढे जात आजच्या तरूण जोडप्याचं तुटलेपण सादर करण्याचं आव्हान दोन्ही कलाकारांनी मस्त पेललं.

तळ्यात मळ्यात  १

तळ्यात मळ्यात  २

तळ्यात मळ्यात  ३

तळ्यात मळ्यात  ४

तळ्यात मळ्यात  ५

तळ्यात मळ्यात  ६

तळ्यात मळ्यात  ७

मग रेणुका बोधनकरने शिबिरार्थींच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त केलं. उत्तम वही (शिबिर दैनंदिनी) लिहिण्याचं प्रोत्साहनपर बक्षिस मिळालं ते जान्हवी काळे, वृशाली कुरणे, अधीश पायगुडे आणि आशिष जाधव यांना. खूप मन लावून आणि अतिशय सविस्तरपणे आणि नीट ही रोजनिशी लिहिल्याबद्दल. या समारंभाच्या अध्यक्षा म्हणून आलेल्या डॉ. माधवी वैद्य (कवयित्री, लेखिका आणि कार्याध्यक्षा, मराठी साहित्य परिषद, पुणे) यांनी मग सर्व शिबिरार्थींचं कौतुक केलं आणि कुसुमाग्रजांच्या कविता आणि अन्य दाखले देत खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि हा सोहळा संपला.

अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य

आज संध्याकाळी जवळपास सर्व शिबिरार्थींचे एकमेकांना आणि प्रशिक्षकांना एसेमेस् गेले असतील. काही शिबिरार्थींनी तर चक्क ५ वाजता व्यायाम केला, वाचन, गप्पा अश्या गोष्टी एकमेकांच्या सोबतीत आजही केल्या आणि मग ९.३० ला श्लोक म्हटला आणि घरी गेले. शिबिराचं हे असंच आहे .. असतं .. ते दिवस संपतात .. पण त्यांची जादू चालूच राहाते .. पुढे अनेक दिवस .. कदाचित जन्मभर !

५ जून २०११ रोजी सायं ६ वाजता …

पीडीएच्या शिबिराचा आता शेवटचा चरण सुरू झाला !

म्हणजे तीन आठवड्यांपैकी तिसरा आठवडा ज्यामधे शिबिरार्थींची शेवटच्या दिवशी सादर होणारी नाटकं बसवायचं काम चालू असतं. पीडीएच्या शिबिरात जसजसे बदल होत गेले तसेच बदल या शेवटच्या दिवशीच्या सादरीकरणांमधे होत गेले.

प्रथम एखादं अर्धंमुर्धं कथानक किंवा कथाबीज घेऊन त्याभोवती किंवा त्यातून एक प्रसंगनाट्य सादर केलं जात असे. यामधे अनेकदा असं दिसू लागलं की ती कथा पूर्ण झाली किंवा केली गेली यातच समाधान मिळाल्याने त्या त्या प्रसंगांचे जे कोणी मार्गदर्शक किंवा दिग्दर्शक असतील ते ते त्यावर अधिक काम करायचं मनावर घेतच नाहीत की काय. असं एक-दोनदा लक्षात आल्यावर या शेवटच्या सादरीकरणांवर पीडीएतील कोणीतरी जुने जाणते कलाकार लक्ष ठेवू लागले. मग या सादरीकरणांचा दर्जा बराच राखला जाऊ लागला.

शिबिराच्या एकंदर अभ्यासक्रमात चार वर्षांपूर्वी मोठा बदल केला गेला तेव्हाच या सादरीकरणांबद्दलही पुनर्विचार केला गेला आणि तेव्हापासून शेवटच्या दिवशी प्रसिद्ध नाटकांमधले प्रवेश चक्क नाटकांप्रमाणे बसवून सादर केले जाऊ लागले. नाटक, त्यातले संवाद, इतर पात्रांसोबतचे व्यवहार, दिग्दर्शकांसोबत काम करणे आणि त्या सगळ्यामधे प्रयोगाची तारीख नावाचं एक ”टेन्शन” हे सर्वच शिबिरार्थींना एका छोट्या स्वरूपात अनुभवायला मिळू लागलं.  या वर्षी भ्रमाचा भोपळा (आचार्य प्र के अत्रे) , मी स्वामी या देहाचा (अनिल बर्वे ) राजा लिअर ( विंदा करंदीकर) आणि तळ्यात मळ्यात (एकांकिका – सागर देशमुख) ह्या चार नाटकातील अंशात्मक सादरीकरणे होणार आहेत.

तेव्हा ५ जून २०११ रोजी सायं ६ वाजता सुदर्शन रंगमंच येथे यायचंय ….

आनंद चाबुकस्वार आणि पीडीएचं शिबिर !

या वर्षीही या आमच्या मित्राचं शिबिरातलं सत्र फार वेगळ्या गंमतीचं झालं. फक्त फरक एव्हढा की ते यावर्षी खूपच लवकर, म्हणजे सातव्याच दिवशी म्हणजे १९ तारखेला झालं. आनंदच्या या शिबिरातल्या या सत्रांचं हे सलग सहावं वर्ष. माणूस, त्याचं अंतर्मन, त्याचे व्यवहार, त्यांचा सृजनशीलतेशी असलेला संबंध आणि खरंतर कलेच्या निर्मितीचा स्रोत जर मनाच्या अगदी थेट गाभ्यापाशी असेल तर कलेचा अस्वाद घेत घेत रसिक आणि केला सादर करत असलेला कलाकार यांच्यात एक वेगळंच नातं निर्माण होत जातं आणि मग अशी निर्मिती आणि आस्वादही आयुष्याला केवळ त्या क्षणापुरतं नव्हे तर दीर्घकाळपर्यंत काही आयाम प्राप्त करून देणारे ठरत जातात ह्या आणि अश्या मांडणीवर आनंदचं काम आधारलेलं आहे. यावर्षी स्वतःच्या शरीराचा आवाज ऐकणं आणि त्याच्याशी बोलणं अश्या अगदी वेगळ्या संकल्पनेतून सुरूवात करत आनंदने सर्वांना एका चांगल्या अर्थी बेचैन केलं आहे. शब्दात धरता येत नाही असा अवर्णनीय आनंद गवसल्याची नोंद सर्वच शिबिरार्थींच्या वह्यांमधे केली गेली आहे. आनंदच्या ह्या वेळच्या सत्राची ही काही चित्रं …..

सुरू …

अखेरीस काल ठीक पांच वाजता, पीडीएचं वार्षिक नाट्य-शिक्षण शिबिर क्र. २० सुरू झालं. हो नाही म्हणता म्हणता काहीतरी घडामोडींच्या योगाने, सेवासदन इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा एरंडवणे येथील इमारतीतला आमचा गेल्या काही वर्षांपासून लाडका झालेला तोच हॉल या शिबिरासाठी उपलब्धही झाला. 

२३ शिबिरार्थींनी काल आपल्या अभ्यासक्रमाला सुरूवात केली. आता रोज ठीक पांच ते रात्री ९.३० पर्यंत एका धमाल वातावरणात ही सगळी मंडळी रमतील. मन आणि शरीर यांना विलक्षण ताण देणार्‍या तर कधी विलक्षण मोकळं करणार्‍या गोष्टी करतील. 

या वर्षी शिबिरात जास्तीचे मिळालेले दोन दिवस, म्हणजे त्यांचे नऊ तास वेगवेगळ्या दिवशी विभागून घेऊन एखाद्या नाट्यबीजाचा संहिता ते प्रयोग हा प्रवास कसा होत जातो हे प्रत्यक्षपणे शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिवाय प्रभाकर भावे (रंगभूषा), आनंद चाबुकस्वार आणि मोहित टाकळकर यांनाही बोलावलं आहेच .. विशेष असं की गेली काही वर्षं अनिरुद्ध खुटवड हा आमचा अत्यंत हुशार दिग्दर्शक मित्र या शिबिरासाठी काही ना काही कारणाने येऊ शकत नव्हता .. तर या वर्षी तोही उपलब्ध होणार असं दिसतंय.

गेल्या दोन वर्षांमधे निरंजन गोखलेने अचानक शिबिराच्या दिवशी अमेरिकेतून इथे प्रकट होऊन शारीरिक आणि त्या अंगाने जाणारे मानसिक व्यायाम, कसरती इत्यादिंची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली होती .. शिबिराला या आताच्या नव्या वाटेवर आणण्यामधे निरंजनचा महत्वाचा सहभाग आणि वाटा आहेच. मंदार कुलकर्णी किंवा मंकु ने हे शिबिर पूर्वी केलंय त्यानंतरच तो ललित कला केंद्राच्या मार्गाने नाट्य-चळवळ्याचा नाट्य-कर्मी झाला आहे. निरंजनच्या या कामात त्याने आजवर त्याला आणि शिबिराला मस्त साथ दिली आहे. या वर्षी तो असेल पण निरंजन मात्र अमेरिकेतून रोज चॅटवरून काही ना काही सुचवत सुचवत या शिबिरात मनाने कायम सहभागी असेल. या सगळयाचा फायदा प्रदीपदादाचं वजन कमी व्हायला नक्कीच होईल कारण या दोघांच्या अनुपस्थितीत प्रदीपदादाने काल हे व्यायामांचं सत्र घेतलं.. नुसते शारीरिक नाही तर त्याच वेळी मनाला ताण देणारे व्यायाम करताना शिबिरार्थींची (आणि प्र.दा.ची ही) बर्‍यापैकी दमणूक झाली. पण गंमत तसूभरही कमी झाली नाही.

आज वह्या लिहिल्या गेल्या असतील, जात असतील किंवा सेवासदनमधे लवकर येऊन लिहिल्या जातील. चहाच्या वेळेत नवीन नवीन मैत्र्यांचे धागे जुळत जातील. एकमेकांना घरी सोडणे, किंवा घरून आणणे इत्यादी बंध निर्माण होऊ लागतील. २३ दिवसांचं शिबिर आणी २४ व्या दिवशीचं सादरीकरण … आणि मग काही बंध त्यानंतरही दृढच राहातील. काही बंधांना अधिक अर्थ प्राप्त होतील किंवा नव्या दिशा मिळतील .. एकंदरीत आजवर ज्यांचे चेहरीही माहित नव्हते अश्या माणसांचं एकमेकांच्या विश्वातच नाही तर भावविश्वात पदार्पण होईल.

आणि मग नेहेमीप्रमाणे शिबिराच्या दरम्यान संध्याकाळी वादळी वळीवाचा पाऊस होईल. मुलांना आणि आम्हाला मिळालेलं हे सरप्राइज, गरम चहा आणि ताजा वडापाव यांच्या रूपात साजरं केलं जाईल … एकंदर मजेची ही पर्वणी आता २३ दिवस अशीच मस्त चालेल !

पीडीए चं नाट्य-शिबिर २०११ !

पीडीए चं नाट्य-शिबिर २०११ !

मे महिन्यासोबत सुट्ट्या, मौज-मजा, आंबे आणि त्याचसोबत न चुकता येतं ते पीडीएचं नाट्य प्रशिक्षण शिबिर. प्रथम भालबा केळकरांनी सुरू केलेलं हे शिबिर पीडीएमधक्याच कलाकारांकरता असे. नंतर घुलेकाकांच्या कारकिर्दीत मेघना वैद्य, दिलीप वेंगुर्लेकर, दीनानाथ टाकळ्कर आणि पाठक सर अश्या काहीजणांनी मिळून हे शिबिर खुलं करायचं ठरवलं आणि मग १९९२ पासून हे शिबिर सर्वांसाठी खुलं झालं. पण खुलं म्हणजे काही महत्वाच्या अटींवरच या शिबिरामधे प्रवेश दिला जाऊ लागला. दर्जा राखण्यासाठी अर्थातच मर्यादित प्रवेश ठेवावा लागणं आलंच आणि त्यासाठी इच्छुकांमधून मुलाखतीद्वारे २५ ते ३०च शिबिरार्थी निवडले जाऊ लागले.

प्रतिवर्षी येणारे अनुभव जमेस धरून शिबिरात योग्य ते बदल करत जात आज या शिबिराचा मूळ हेतू हा असतो की नाटक ज्या कोणाला मनापासून करावसं वाटतं, त्यातल्या खरंच उत्कट इच्छार्थींना नाटक या प्रकाराची परिभाषा, नाटकाबद्दल सर्व माहिती, नाटकातल्या कोणाकडूनही अपेक्षित असते शिस्त, नाटकाचं तर्कशास्त्र, नाटक आणि जीवन यांचा संबंध, चित्रपट / मालिका आणि नाटकामधले फरक, अभिनय, तंत्र आणि संहिता ते प्रयोग हा प्रवास अशी सर्व संकल्पना स्पष्ट करण्याचा हेतू मनात ठेवून शिबिराची आखणी केली जाते आणि संचालनही तसंच शिस्तबद्ध पण आनंद कधीही कणभरही कमी न होऊ देणार असतं.

या वर्षीचं पीडीए शिबिर तीन दिवसांनी वाढवलं आहे. समारोपाचा कार्यक्रम ५ जून रोजी सायंकाळी आहे, त्यामुळे ११ मे २०११ ते ४ जून २०११ असा शिबिरातील प्रशिक्षणाचा कालावधी आहे. या कालावधीत रोज सायंकाळी ठीक पांच ते रात्रौ ९.३० अशी शिबिराची वेळ आहे.

एकही दिवस उशिरा न येणं आणि एकही दिवस शिबिराला दांडी मारणं या शिबिरात करता येत नाही. उशिरा येणं किंवा न येणं या घाणेरड्या सवयीतून २२-२३ दिवस नक्की सुटका हवी असेल त्यांना किंवा तशी सवय मुळातच असलेल्यांना हे जड जात नाही .. पण महत्वाचं हे, की नाटक खरंच उत्कटतेने करायचं असेल अशाच शिबिरार्थीला हे करण्यात काहीही अडचण वाटत नाही हे नक्की. नाटकात यायचं असेल तर स्वत:पेक्षा स्वत:च्या कामाला मोठं मानता येणं फार मह्त्वाचं आहे असा हा नाटकाचा पहिला धडा शिबिरार्थी रोज गिरवतात.

या शिवाय शिबिरात आज काय काय घडलं ते स्वत:च्या दृष्टिकोणातून लिहिण्यासाठी एक वही दिली जाते. हे वही संपवली तर दुसरी .. तिसरी .. कितीही वह्या घ्या पण संपूर्ण वृत्तांत लिहा असा आग्रह असतो. हे लेखन शक्यतोवर मराठीतच करायचं असतं. अनेक शिबिरार्थी ही वही कसलातरी महत्वाचा वारसा वगैरे असल्याप्रमाणे जपून ठेवतात.

असो. शिबिरात येण्याचे फायदे शिबिरार्थीच तुम्हाला सांगतील. पीडीएचं शिबिर मला करायचंय . .. कोणी केलंय का .. काय मत आहे .. करू का ? असे प्रश्न फेसबुकात फक्त विचारून पाहा …