सहस्रचंद्रदर्शन पुन्हा नव्याने !

४ जुलै २०११ ….
संध्याकाळी आमच्या पद्धतीप्रमाणे ठीक वेळेवर म्हणजे ७.३० ला आमच्याकरता जादू ठरलेलं आमचं नाटक सहस्रचंद्रदर्शन पुन्हा नव्याने सुरू झालं.
हे नाटक, पात्रबदल किंवा रिप्लेस्मेन्ट्स् करून करायला दिग्दर्शक प्रदीप वैद्य याचा प्रथमतः नकार होता. नाटक खूप सूक्ष्म गोष्टींनी बांधून बसवलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी पुन्हा वेगळया लोकांबरोबर बांधता येणं जवळपास अशक्य आहे असं काहीसं तेव्हा त्याच्या मनात होतं आणि ते त्याने बोलूनही दाखवलं होतं. पण अश्या प्रकारे दोन वर्षं गेल्यावर. या वर्षीच्या शिबिरानंतर सहस्र परत करूया या मागणीने जोर धरला आणि प्रदीपलाही काय झालं काय माहित पण तो ही तीन भूमिकांसाठी चक्क नवीन मुलींना घेऊन पुन्हा नाटक बांधायला तयार झाला.
प्रथम श्वेता, दीपा आणि मीना या भूमिका आताही करत असलेल्या पण जुन्या संचातल्या अमृता, संयोगिता आणि सायली यांनी एकेका नव्या मुलीची प्राथमिक तयारी करून घेतली. अशी तालीम जवळजवळ दोन आठवडे झाली. प्रदीप या तालमीच्या जागी फिरकतही नव्हता. आधी खूप प्रश्न पडत होते तो का येत नाही याबद्दल .. पण नंतर त्यानेच सांगितलं की त्याने हे असं ठरवून देण्याचं आणि तिकडे न येण्याचं कारण होतं आणि ते असं की या अश्या तालमीच्या निमित्ताने, या मुलींची या तीन स्त्री पात्रांशी सततची देवाणघेवाण होत राहिल्यामुळे त्यांच्यामधे एक आपुलकी निर्माण होणार होतीच आणि ती प्रदीपला अत्यंत आवश्यक वाटत होती. हे नाटक मूळ ज्या सूक्ष्म गोष्टींनी बांधलेलं आहे त्यापासून ते ढळू न देण्याचा एक प्रकारचा निश्चय किंवा त्याचं नियोजनच यात सुरू झालं आणि खरंच नाटकाच्या नंतर नंतर सुरू झालेल्या विविध प्रवेशांच्या तालमींच्या वेळी आम्ही सगळे एकमेकांकडे एकाच घरातल्या लोकांसारखे पाहू-बोलू लागलो होतो.
या वेळीही तालमी पुन्हा वेगळ्या पद्धतीने झाल्या आणि नाटक पुन्हा जवळपास तसंच उभं राहिलं .. जवळपास हा शब्द इथे अशाकरता, की एखादं नवीन माणूस एखादी भूमिका करतं तेव्हा ती भूमिका नव्या शक्यतांनी भारावली जाते. नाटकाचा आशय, विषयवस्तू यांना काहीही धक्का न लागता, नाटकात घडणार्‍या  प्रत्येक क्षणामधे काहीतरी नवीन घडत असतं .. ते सूक्ष्मच असतं, पण हे सूक्ष्म काहीतरी त्या नाटकाला जिवंत अनुभवाकडे नेऊ लागतं याचा प्रत्यय या प्रयोगाच्या वेळी आम्हा कलाकारांना आला आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून त्यांनाही तसा अनुभव मिळत गेल्याचं जाणवत आहेच … या नाट्यप्रयोगची काही क्षणचित्रं इथे देत आहोत … आपण हा प्रयोग पाहिलात का ? नसेल पाहिला तर जरूर या आमच्या पुढल्या प्रयोगाला !
आणि प्रयोग पाहिला असेल तर आपली जी काही प्रतिक्रिया असेल ती प्रतिक्रिया इथेच या लेखनाखाली ..

अभिप्राय या सदरात अवश्य द्या !



पेशवाई २०११ !

पेशवाई २०११ !


२१ जून २०११ ला .. 
पर्वती टेकडीवरील नानासाहेब पेशवे यांचे समाधीस्थळ .. 
सायं ६.३० वाजता 
पीडीए च्या ३५ वर्षं जुन्या पर्वती प्रोजेक्ट अंतर्गत 
सादर होणारा कार्यक्रम असा आहे ..


१) सांप्रदायिक लोककलांवर आधारित मराठी नाटक

शापवाणी आख्यान

लेखक, दिग्दर्शक, संगीत : प्रदीप वैद्य

नानासाहेब पेशवे यांनी पुणे शहरासाठी केलेल्या कामाचा आधुनिक पोवाड्याचा नृत्याविष्कार


पुणे तिथे काय उणे !
गीत, संगीत आणि स्वर : प्रदीप वैद्य
 
सर्वांना सस्नेह निमंत्रण !

पीडीएच्या शिबिराचा समारोप !

वीस वर्षं .. वीस समारोपाचे दिवस .. पण वातावरण तितकंच (किंवा कांकणभर जास्त) भावनिक झालेलं … आणि मग ९.३० च्या सुमारास डोळ्यातले अश्रू पुसत, किंवा मस्त दिलखुलास हसत घेतलेल्या निरोपांचे तेच भारलेले क्षण ! काल म्हणजे ५ जून २०११ ला सुदर्शन रंगमंचावर पूर्ण भरलेल्या सभागृहासमोर पीडीएच्या नव्या प्रशिक्षणार्थींचे चार नाट्यप्रवेश सादर झाले. या प्रवेशांमधे भाग घेतलेले जवळजवळ सर्वचजण रंगमंचावर प्रथमच पाऊल ठेवत होते. काहींनी फार वर्षांपूर्वी बालनाट्यात घेतलेल्या सहभागानंतर थेट आज पुन्हा रंगमंचावरचा प्रकाश अंगावर झेलला होता .. आणि ह्या नाट्यप्रवेशांची आणखी एक गंमत अशी होती की हे प्रवेश या नव्या कलाकारांना हाताशी घेऊन त्यांच्या दिग्दर्शकांनी केवळ पाच दिवसात बसवले होते. ज्यांनी ती पाहिले त्यांनी भरभरून शाबासकी दिली. पण ज्यांनी ते पाहिले नाही त्यांच्यासाठी इथे काही क्षणचित्रंही देत आहोत.

हे नाट्यप्रवेश गेल्या चार वर्षांपासून थेट नाटकाच्या सादरीकरणाची चुणूक शिबिरार्थींना मिळावी म्हणून बसवायला सुरूवात केली गेली. म्हणजे हा जो कालचा समारंभ होता, तो या सादरीकरणांच्या कालावधीपर्यंत त्यांच्या शिक्षणाचाच भाग होता हे आता इथे सांगायला हरकत नाही. प्रशिक्षणासाठी एखाद्या नाट्य-प्रशिक्षण संस्थेमधे अथवा विद्यापीठात जे केलं जातं ते सर्व इथे, पीडीएमधे केलं जातंच पण त्यात पीडीएने गेल्या अनेक वर्षांमधे कमावलेल्या उत्तम व्यवस्थापन कौशल्यांचा आणि ते साकारणार्‍या आमच्या सगळ्या सदस्यांचाही कस इथे लागत असतो. प्रसंगानुरूप वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य, प्रकाश (आणि संगीतही) हे सर्व वेळच्यावेळी, म्हणजे एकतर तालमींच्या एकंदर पांच दिवसांपैकी जवळपास शेवटच्या एक-दोन दिवसातच जागच्याजागी उपलब्ध करून देणं ही एक कमालच असते. प्रेक्षकांचा फार वेळ न खाता काही क्षणात पुढल्या प्रवेशासाठी सर्व सिद्धता सुदर्शनमधे करून दिली जात असते. यातूनच पीडीएची अफलातून बॅकस्टेज टीम तयार होत गेली आहे. स्मिता तावरे, अमृता वाणी, प्राजक्ता पाटील, प्रवीण निडगुंडे, रूपाली भावे, विक्रांत ठकार ही सर्व मंडळी ही सर्व जय्यत तयारी करण्यात आणि शिबिरार्थींना तयार करण्यात गुंतली होती .. दुपारी तीन वाजल्यापासून अगदी थेट समारंभ संपल्यावरही त्यांचं काम चालूच होतं.

काल पहिला प्रवेश सादर झाला तो आचार्य अत्रे यांच्या भ्रमाचा भोपळा या नाटकावर आधारित होता. अत्र्यांची भाषा आणि त्यातला गडगडाटी विनोद एक शिबिर केल्यावर शेवटच्या पाच दिवसांच्या तालमींच्या भांडवलावर पेलणं हे महा-आव्हान या संघाने चांगलंच पेललं. तरूण पिढीतल्या प्रेक्षकांनी काही विनोद तर अक्षरशः डोक्यावर घेतले. निखिल देव आणि सागर यार्दी या दोघांनी या प्रवेशाचं दिग्दर्शन केलं होतं

भ्रमाचा भोपळा १

भ्रमाचा भोपळा २

भ्रमाचा भोपळा ३

भ्रमाचा भोपळा ४

भ्रमाचा भोपळा ५

भ्रमाचा भोपळा ६

भ्रमाचा भोपळा ७

दुसरा प्रवेश सादर केला गेला तो होता “एक लिअर असा !” ह्या मधे विंदा करंदीकर यांनी शेक्सपिअरच्या किंग लिअरचं जे मराठी भाषांतर केलं आहे, त्यातील काही स्वगतांसहित एका ज्येष्ठ नाट्यकलावंताच्या भ्रमिष्ठपणासोबत, त्याच्या मुलीने त्याचा घेतलेला शोध असं कथानक होतं. प्रदीप वैद्य यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या प्रवेशात अभिनयावर कलाकारांनी घेतलेली मेहनत आणि अगदी छोट्यातछोटे बारकावेही न सोडता केलेला नैसर्गिक अभिनय ही वैशिष्ठ्ये होती.

एक लिअर… १

एक लिअर… २

एक लिअर… ३

एक लिअर… ४

एक लिअर… ५

एक लिअर… ६

एक लिअर… ७

अनिल बर्वे हे व्यावसायिक रंगभूमीला अतिशय वेगळ्या धाटणीची समर्थ नाटकं देणार्‍या लेखकाचं नाव. अलिकडे त्यांचं हमीदाबाईची कोठी हे नाटक पुन्हा रंगमंचावर आलं आहे. त्याचं आणखी एक नाटक “ मी स्वामी या देहाचा ..” चक्क इच्छामरण या विषयावर होतं आणि ते जवळपास वीस वर्षांपूर्वी व्यावसायिक रंगभूमीवर सादर होत होतं. या नाटकातल्या प्रवेशावर आधारित तिसरं सादरीकरण संहितेची उत्तम बांधीव रचना आणि त्यामधे मांडलेले या विषयाशी संबंधित विविध प्रश्न लोकांसमोर संयत पण प्रभावीपणे सादर करणार्‍या या नवीन कलाकारांमुळे चांगलंच वठलं ! दिग्दर्शक अशिष वझे.

मी स्वामी … १

मी स्वामी …२

मी स्वामी … ३

मी स्वामी … ४

मी स्वामी … ५

मी स्वामी … ६

मी स्वामी … ७

यावर्षीच्या प्रवेशनिवडीचं वैशिष्ठ्य असं की सर्व विविध प्रकारचे प्रवेश यावर्षी होते. जुनं, विनोदी, भाषेचं सौंदर्य जपणारं, लयबद्ध संवाद असलेलं, थोडं भास-आभासांचं नाट्य, काहीसं जुन्या पण ठाशीव रचनेचं, उत्तम संवादात्मक रचनेचं या सर्वांसोबतच अगदी आजचं, प्रायोगिक रंगभूमीवरचं आजच्या जीवनाचा शोध घेणारं असही त्यात होतं .. सागर देशमुख ह्या पीडीएच्या शिबिरातच आपली नाट्यवाटचाल सुरू केलेल्या तरूण लेखकाचं तळ्यात मळ्यात हे नाटक रुपाली भावेने दिग्दर्शित केलं होतं .. ही एकांकिका पस्तीस मिनिटं दोनच कलाकारांमधे सादर होते .. हे एव्हढंच नाही तर त्यातले सर्व बारकावे टिपत, ते सादर करत पुढे जात आजच्या तरूण जोडप्याचं तुटलेपण सादर करण्याचं आव्हान दोन्ही कलाकारांनी मस्त पेललं.

तळ्यात मळ्यात  १

तळ्यात मळ्यात  २

तळ्यात मळ्यात  ३

तळ्यात मळ्यात  ४

तळ्यात मळ्यात  ५

तळ्यात मळ्यात  ६

तळ्यात मळ्यात  ७

मग रेणुका बोधनकरने शिबिरार्थींच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त केलं. उत्तम वही (शिबिर दैनंदिनी) लिहिण्याचं प्रोत्साहनपर बक्षिस मिळालं ते जान्हवी काळे, वृशाली कुरणे, अधीश पायगुडे आणि आशिष जाधव यांना. खूप मन लावून आणि अतिशय सविस्तरपणे आणि नीट ही रोजनिशी लिहिल्याबद्दल. या समारंभाच्या अध्यक्षा म्हणून आलेल्या डॉ. माधवी वैद्य (कवयित्री, लेखिका आणि कार्याध्यक्षा, मराठी साहित्य परिषद, पुणे) यांनी मग सर्व शिबिरार्थींचं कौतुक केलं आणि कुसुमाग्रजांच्या कविता आणि अन्य दाखले देत खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि हा सोहळा संपला.

अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य

आज संध्याकाळी जवळपास सर्व शिबिरार्थींचे एकमेकांना आणि प्रशिक्षकांना एसेमेस् गेले असतील. काही शिबिरार्थींनी तर चक्क ५ वाजता व्यायाम केला, वाचन, गप्पा अश्या गोष्टी एकमेकांच्या सोबतीत आजही केल्या आणि मग ९.३० ला श्लोक म्हटला आणि घरी गेले. शिबिराचं हे असंच आहे .. असतं .. ते दिवस संपतात .. पण त्यांची जादू चालूच राहाते .. पुढे अनेक दिवस .. कदाचित जन्मभर !

५ जून २०११ रोजी सायं ६ वाजता …

पीडीएच्या शिबिराचा आता शेवटचा चरण सुरू झाला !

म्हणजे तीन आठवड्यांपैकी तिसरा आठवडा ज्यामधे शिबिरार्थींची शेवटच्या दिवशी सादर होणारी नाटकं बसवायचं काम चालू असतं. पीडीएच्या शिबिरात जसजसे बदल होत गेले तसेच बदल या शेवटच्या दिवशीच्या सादरीकरणांमधे होत गेले.

प्रथम एखादं अर्धंमुर्धं कथानक किंवा कथाबीज घेऊन त्याभोवती किंवा त्यातून एक प्रसंगनाट्य सादर केलं जात असे. यामधे अनेकदा असं दिसू लागलं की ती कथा पूर्ण झाली किंवा केली गेली यातच समाधान मिळाल्याने त्या त्या प्रसंगांचे जे कोणी मार्गदर्शक किंवा दिग्दर्शक असतील ते ते त्यावर अधिक काम करायचं मनावर घेतच नाहीत की काय. असं एक-दोनदा लक्षात आल्यावर या शेवटच्या सादरीकरणांवर पीडीएतील कोणीतरी जुने जाणते कलाकार लक्ष ठेवू लागले. मग या सादरीकरणांचा दर्जा बराच राखला जाऊ लागला.

शिबिराच्या एकंदर अभ्यासक्रमात चार वर्षांपूर्वी मोठा बदल केला गेला तेव्हाच या सादरीकरणांबद्दलही पुनर्विचार केला गेला आणि तेव्हापासून शेवटच्या दिवशी प्रसिद्ध नाटकांमधले प्रवेश चक्क नाटकांप्रमाणे बसवून सादर केले जाऊ लागले. नाटक, त्यातले संवाद, इतर पात्रांसोबतचे व्यवहार, दिग्दर्शकांसोबत काम करणे आणि त्या सगळ्यामधे प्रयोगाची तारीख नावाचं एक ”टेन्शन” हे सर्वच शिबिरार्थींना एका छोट्या स्वरूपात अनुभवायला मिळू लागलं.  या वर्षी भ्रमाचा भोपळा (आचार्य प्र के अत्रे) , मी स्वामी या देहाचा (अनिल बर्वे ) राजा लिअर ( विंदा करंदीकर) आणि तळ्यात मळ्यात (एकांकिका – सागर देशमुख) ह्या चार नाटकातील अंशात्मक सादरीकरणे होणार आहेत.

तेव्हा ५ जून २०११ रोजी सायं ६ वाजता सुदर्शन रंगमंच येथे यायचंय ….

आनंद चाबुकस्वार आणि पीडीएचं शिबिर !

या वर्षीही या आमच्या मित्राचं शिबिरातलं सत्र फार वेगळ्या गंमतीचं झालं. फक्त फरक एव्हढा की ते यावर्षी खूपच लवकर, म्हणजे सातव्याच दिवशी म्हणजे १९ तारखेला झालं. आनंदच्या या शिबिरातल्या या सत्रांचं हे सलग सहावं वर्ष. माणूस, त्याचं अंतर्मन, त्याचे व्यवहार, त्यांचा सृजनशीलतेशी असलेला संबंध आणि खरंतर कलेच्या निर्मितीचा स्रोत जर मनाच्या अगदी थेट गाभ्यापाशी असेल तर कलेचा अस्वाद घेत घेत रसिक आणि केला सादर करत असलेला कलाकार यांच्यात एक वेगळंच नातं निर्माण होत जातं आणि मग अशी निर्मिती आणि आस्वादही आयुष्याला केवळ त्या क्षणापुरतं नव्हे तर दीर्घकाळपर्यंत काही आयाम प्राप्त करून देणारे ठरत जातात ह्या आणि अश्या मांडणीवर आनंदचं काम आधारलेलं आहे. यावर्षी स्वतःच्या शरीराचा आवाज ऐकणं आणि त्याच्याशी बोलणं अश्या अगदी वेगळ्या संकल्पनेतून सुरूवात करत आनंदने सर्वांना एका चांगल्या अर्थी बेचैन केलं आहे. शब्दात धरता येत नाही असा अवर्णनीय आनंद गवसल्याची नोंद सर्वच शिबिरार्थींच्या वह्यांमधे केली गेली आहे. आनंदच्या ह्या वेळच्या सत्राची ही काही चित्रं …..

सुरू …

अखेरीस काल ठीक पांच वाजता, पीडीएचं वार्षिक नाट्य-शिक्षण शिबिर क्र. २० सुरू झालं. हो नाही म्हणता म्हणता काहीतरी घडामोडींच्या योगाने, सेवासदन इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा एरंडवणे येथील इमारतीतला आमचा गेल्या काही वर्षांपासून लाडका झालेला तोच हॉल या शिबिरासाठी उपलब्धही झाला. 

२३ शिबिरार्थींनी काल आपल्या अभ्यासक्रमाला सुरूवात केली. आता रोज ठीक पांच ते रात्री ९.३० पर्यंत एका धमाल वातावरणात ही सगळी मंडळी रमतील. मन आणि शरीर यांना विलक्षण ताण देणार्‍या तर कधी विलक्षण मोकळं करणार्‍या गोष्टी करतील. 

या वर्षी शिबिरात जास्तीचे मिळालेले दोन दिवस, म्हणजे त्यांचे नऊ तास वेगवेगळ्या दिवशी विभागून घेऊन एखाद्या नाट्यबीजाचा संहिता ते प्रयोग हा प्रवास कसा होत जातो हे प्रत्यक्षपणे शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिवाय प्रभाकर भावे (रंगभूषा), आनंद चाबुकस्वार आणि मोहित टाकळकर यांनाही बोलावलं आहेच .. विशेष असं की गेली काही वर्षं अनिरुद्ध खुटवड हा आमचा अत्यंत हुशार दिग्दर्शक मित्र या शिबिरासाठी काही ना काही कारणाने येऊ शकत नव्हता .. तर या वर्षी तोही उपलब्ध होणार असं दिसतंय.

गेल्या दोन वर्षांमधे निरंजन गोखलेने अचानक शिबिराच्या दिवशी अमेरिकेतून इथे प्रकट होऊन शारीरिक आणि त्या अंगाने जाणारे मानसिक व्यायाम, कसरती इत्यादिंची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली होती .. शिबिराला या आताच्या नव्या वाटेवर आणण्यामधे निरंजनचा महत्वाचा सहभाग आणि वाटा आहेच. मंदार कुलकर्णी किंवा मंकु ने हे शिबिर पूर्वी केलंय त्यानंतरच तो ललित कला केंद्राच्या मार्गाने नाट्य-चळवळ्याचा नाट्य-कर्मी झाला आहे. निरंजनच्या या कामात त्याने आजवर त्याला आणि शिबिराला मस्त साथ दिली आहे. या वर्षी तो असेल पण निरंजन मात्र अमेरिकेतून रोज चॅटवरून काही ना काही सुचवत सुचवत या शिबिरात मनाने कायम सहभागी असेल. या सगळयाचा फायदा प्रदीपदादाचं वजन कमी व्हायला नक्कीच होईल कारण या दोघांच्या अनुपस्थितीत प्रदीपदादाने काल हे व्यायामांचं सत्र घेतलं.. नुसते शारीरिक नाही तर त्याच वेळी मनाला ताण देणारे व्यायाम करताना शिबिरार्थींची (आणि प्र.दा.ची ही) बर्‍यापैकी दमणूक झाली. पण गंमत तसूभरही कमी झाली नाही.

आज वह्या लिहिल्या गेल्या असतील, जात असतील किंवा सेवासदनमधे लवकर येऊन लिहिल्या जातील. चहाच्या वेळेत नवीन नवीन मैत्र्यांचे धागे जुळत जातील. एकमेकांना घरी सोडणे, किंवा घरून आणणे इत्यादी बंध निर्माण होऊ लागतील. २३ दिवसांचं शिबिर आणी २४ व्या दिवशीचं सादरीकरण … आणि मग काही बंध त्यानंतरही दृढच राहातील. काही बंधांना अधिक अर्थ प्राप्त होतील किंवा नव्या दिशा मिळतील .. एकंदरीत आजवर ज्यांचे चेहरीही माहित नव्हते अश्या माणसांचं एकमेकांच्या विश्वातच नाही तर भावविश्वात पदार्पण होईल.

आणि मग नेहेमीप्रमाणे शिबिराच्या दरम्यान संध्याकाळी वादळी वळीवाचा पाऊस होईल. मुलांना आणि आम्हाला मिळालेलं हे सरप्राइज, गरम चहा आणि ताजा वडापाव यांच्या रूपात साजरं केलं जाईल … एकंदर मजेची ही पर्वणी आता २३ दिवस अशीच मस्त चालेल !

पीडीए चं नाट्य-शिबिर २०११ !

पीडीए चं नाट्य-शिबिर २०११ !

मे महिन्यासोबत सुट्ट्या, मौज-मजा, आंबे आणि त्याचसोबत न चुकता येतं ते पीडीएचं नाट्य प्रशिक्षण शिबिर. प्रथम भालबा केळकरांनी सुरू केलेलं हे शिबिर पीडीएमधक्याच कलाकारांकरता असे. नंतर घुलेकाकांच्या कारकिर्दीत मेघना वैद्य, दिलीप वेंगुर्लेकर, दीनानाथ टाकळ्कर आणि पाठक सर अश्या काहीजणांनी मिळून हे शिबिर खुलं करायचं ठरवलं आणि मग १९९२ पासून हे शिबिर सर्वांसाठी खुलं झालं. पण खुलं म्हणजे काही महत्वाच्या अटींवरच या शिबिरामधे प्रवेश दिला जाऊ लागला. दर्जा राखण्यासाठी अर्थातच मर्यादित प्रवेश ठेवावा लागणं आलंच आणि त्यासाठी इच्छुकांमधून मुलाखतीद्वारे २५ ते ३०च शिबिरार्थी निवडले जाऊ लागले.

प्रतिवर्षी येणारे अनुभव जमेस धरून शिबिरात योग्य ते बदल करत जात आज या शिबिराचा मूळ हेतू हा असतो की नाटक ज्या कोणाला मनापासून करावसं वाटतं, त्यातल्या खरंच उत्कट इच्छार्थींना नाटक या प्रकाराची परिभाषा, नाटकाबद्दल सर्व माहिती, नाटकातल्या कोणाकडूनही अपेक्षित असते शिस्त, नाटकाचं तर्कशास्त्र, नाटक आणि जीवन यांचा संबंध, चित्रपट / मालिका आणि नाटकामधले फरक, अभिनय, तंत्र आणि संहिता ते प्रयोग हा प्रवास अशी सर्व संकल्पना स्पष्ट करण्याचा हेतू मनात ठेवून शिबिराची आखणी केली जाते आणि संचालनही तसंच शिस्तबद्ध पण आनंद कधीही कणभरही कमी न होऊ देणार असतं.

या वर्षीचं पीडीए शिबिर तीन दिवसांनी वाढवलं आहे. समारोपाचा कार्यक्रम ५ जून रोजी सायंकाळी आहे, त्यामुळे ११ मे २०११ ते ४ जून २०११ असा शिबिरातील प्रशिक्षणाचा कालावधी आहे. या कालावधीत रोज सायंकाळी ठीक पांच ते रात्रौ ९.३० अशी शिबिराची वेळ आहे.

एकही दिवस उशिरा न येणं आणि एकही दिवस शिबिराला दांडी मारणं या शिबिरात करता येत नाही. उशिरा येणं किंवा न येणं या घाणेरड्या सवयीतून २२-२३ दिवस नक्की सुटका हवी असेल त्यांना किंवा तशी सवय मुळातच असलेल्यांना हे जड जात नाही .. पण महत्वाचं हे, की नाटक खरंच उत्कटतेने करायचं असेल अशाच शिबिरार्थीला हे करण्यात काहीही अडचण वाटत नाही हे नक्की. नाटकात यायचं असेल तर स्वत:पेक्षा स्वत:च्या कामाला मोठं मानता येणं फार मह्त्वाचं आहे असा हा नाटकाचा पहिला धडा शिबिरार्थी रोज गिरवतात.

या शिवाय शिबिरात आज काय काय घडलं ते स्वत:च्या दृष्टिकोणातून लिहिण्यासाठी एक वही दिली जाते. हे वही संपवली तर दुसरी .. तिसरी .. कितीही वह्या घ्या पण संपूर्ण वृत्तांत लिहा असा आग्रह असतो. हे लेखन शक्यतोवर मराठीतच करायचं असतं. अनेक शिबिरार्थी ही वही कसलातरी महत्वाचा वारसा वगैरे असल्याप्रमाणे जपून ठेवतात.

असो. शिबिरात येण्याचे फायदे शिबिरार्थीच तुम्हाला सांगतील. पीडीएचं शिबिर मला करायचंय . .. कोणी केलंय का .. काय मत आहे .. करू का ? असे प्रश्न फेसबुकात फक्त विचारून पाहा …

खूप दिवसांनी ….

खूप खूप खूप दिवसांनी म्हणजे चिक्कार दिवसांनी आम्ही परत आलो आहोत .. नक्की काय सांगावं हे कळत नसल्याने म्हणा किंवा कोणी काय सांगावं हे कळत नसल्याने म्हणा आम्ही काहीच सांगत नव्हतो .. १९ ऑक्टोबर चा सख्खे शेजारी चा प्रयोग, झाडे-मातीच्या मनातील कविता ची पुनर्निर्मिती आणि त्या प्रयोगासोबत चित्र प्रदर्शन असे उपक्रम इथे पुण्यात आणि प्रदीप वैद्यच्या दिग्दर्शकीय अनुपस्थितीत .. नंतर आशिष वझेच्या दिग्दर्शनाखाली सख्खे शेजारीचे आणखी काही प्रयोग चेन्नई आणि बंगलोर येथे झाले. नवीन नवीन बरेच कलाकार या निमित्ताने सख्खे शेजारीमधे दाखल झाले आणि बाहेरही गेले .. पण हां हां म्हणता सख्खे शेजारीचे १० प्रयोगही झाले. त्या प्रयोगांविषयी सविस्तर थोड्याच दिवसात इथे वाचालच तुम्ही ..

आता पीडीएच्या साठाव्या वर्षातल्या उपक्रमांविषयी येत्या शनिवारी काही ठोस ठरल्यावर पुन्हा तुमच्या समोर येऊ …  तोपर्यंत .. राम राम ! :)

लॉस्ट सोनाटाचं वाचन !

आज म्हणजे ४ नोव्हेंबर २०१० ला पीडीए च्या नव्या नाटकाचं वाचन झालं .. या नाटकातला काही भाग खाली देत आहोत ..

दुसरं म्हणजे कैवल्य रंगारी या तरूण कलाकाराने पीडीए ची नवी वेब-साइट तयार केली आहे ती काही दिवसातच तुम्हाला वेब वर पाहायला मिळेल .. कैवल्यच्या या कामाची दाद म्हणून त्याला जास्तीत जास्त अश्या पद्धतीचं काम मिळू द्या … त्याचं नाव शक्य तिथे सुचवा !

आता नाटकातला भाग (सध्या या नाटकाचं नाव “लॉस्ट सोनाटा” असं आहे )

1)

रंजना :

ओळखीचा उर्मटपणा .. त्या गणेशच्यात ठासून भरलाय .. मी रात्री त्याला हाकललं .. पण सकाळी तो .. त्याने .. जे वाजवलं ते … त्याला फक्त कलाने नाही मर्चंटनेही शिकवलेलं स्पष्ट कळतंय .. आणि इतर सगळे घोळ .. जे काही आहेत त्यातलं त्याला सगळं नाही तरी महत्वाचं माहिती आहे हे नक्की .. त्यामुळे .. त्याला इथे थांबवण्यात तसा प्रॉब्लेम दिसत नाही .. मी त्याला थांबवायचं ठरवलंय .. तो आगाऊ आहेच त्यामुळे .. विशाखा आणि सत्यजीतना कळेल तेव्हा काय याची काळजी मी नको करायला .. शेवटी कला सिद्धिरामनचा एकटीचा का मुलगा आहे तो ? मर्चंटचा ही तो मुलगाच आहे ! सन ऑफ अ बिच आणि सन ऑफ अ ग्रेट व्हायलनिस्ट !

2)

रंजना : (तिच्या डोळ्यात अश्रू) बारटोक ल्युकेमियाने गेला .. तो गेला त्यावेळी मी तिथे नव्हते .. पण कीमोचे पहिले काही डोस दिले गेले तेव्हा मी शिकत होते तिथे .. त्याचे डोळे आठवतात .. मी त्याच्या शेजारी उभी राहून त्याला म्हणाले होते .. “मी आज प्रयत्न केला सोनाटा .. सोलो व्हायलिन ..” तेव्हा माझा हात घट्ट आवळत रागावून “अन-अकंपनीड व्हायलिन” असं मला दटावतानाचं .. त्याच्या डोळ्यातलं पाणी मला आठवतं ..गणेश : मला शिकायचाय हा सोनाटा ..

3)

सत्यजीत : आपण ग्रँड कॅन्यन ला गेलो होतो .. तू मी आणि सई  .. तू तिचा हात धरधरून दाट काळोखानं भरलेल्या एका दरीत डोळे फाडफाडून पाहायचा प्रयत्न करत होतीस .. तेव्हा तुझ्या आईने एक कविता केली आणि म्हटली होती .. उत्स्फूर्तपणे .. मला कविता, कथा आणि त्यातल्या ओळी अगदी तश्याच्यातश्या कधी आठवत नाहीत .. पण त्या कवितेत मनाची तुलना तिने त्या ग्रॅंड कॅन्यनच्या रचनेशी केली होती .. कितीतरी अश्या कपारी तिथे आहेत जिथे प्रकाश कधी पोहोचलेलाच नाही .. त्या कपारींमधी काय दडलेलं असेल काय सांगता येतं ? अशी काहीतरी ती कविता होती .. मनात अश्या किती अंधार भरलेल्या जागा असतील .. त्या जागांमधे कोणत्या प्रतिमा भरून असतील, कोणकोणते वास, ध्वनी तिथे भरून बसले असतील ते काय सांगता येतं .. आणि असं काहीतरी होतं आणि त्या प्रतिमा हुसकावलेल्या वटवाघळांसारख्या अचानक उफाळून वर येतात ..

4)

गणेश : तो म्हणायचा .. मर्चंट को जिंदगीभर यहीं सुनाया .. तेरे को तो खडा भी नही करेगी .. I wonder .. even he was so accomplished .. तर मग ह्या basics वर ?

रंजना : मर्चंट नोटेशन उत्तम वाजवायचा .. तुलाही तेव्हढंच करायचं असेल तर .. ठीक आहे ..

गणेश : This is too much .. merchant was the best violonist in Indian Film Industry

रंजना : रंजना नसलेल्या इंडस्ट्रीत ! त्याने तुला हे नाही सांगितलं का ?

ती त्याच्या जवळ येते. त्याचं व्हायलिन त्याला ठीक पकडायला लावत बोलते.

रंजना : व्हायलिन काय किंवा कोणतंही वाद्य काय ती एक आवाज काढणारी वस्तू म्हणून पकडायची नसते .. जिवंत काहीतरी म्हणून पकडायची असते .. एक झाड .. एखादा प्राणी, एखाद-दोन कारागीर अश्या प्रत्येकाचं त्यात आपलं .. जीवाचं काहीतरी असतं .. आपला जीव-श्वास लावून जिवंत केलेलं असतं त्यांनी त्या वाद्याला .. त्यांचा श्वास असतो त्यामधे, त्यांचा वास असतो .. वाद्य एक क्षण नुसतं हातात घे .. आपल्या शरीराला त्याचा स्पर्श झाला की डोळे मीट आणि त्या वाद्याचा श्वास ऐकू येतो का ते बघ … आणि आपला नि त्याचा श्वास एक होऊ दे .. आपल्या शरीराचं ते आता एक अंग आहे .. एक इंद्रिय .. आपल्याला डोक्यात .. मनात जे वाटतंय ते आपल्याला व्यक्त करायचं आहे .. त्यासाठी जसा आपला चेहरा, हात, डोळे निसर्गाने आपल्याला दिले आहेत तसंच एका भन्नाट योगायोगाने हे आणखी एक इंद्रिय आपल्याला आत्ता लाभलंय .. आपल्या शरीराचाच तो एक भाग आहे .. आपल्याला जे  म्हणायचंय तेच हा भाग आता म्हणणार आहे .. त्याचा नि आपला श्वास एक आहे, त्याचा नि आपला ध्यास आता एक असेल .. त्याचं नि आपलं म्हणणं आता एकच असेल !

आता हळू हळू गणेशच्या व्हायलिन चे सूर उमटू लागतात ..

हळू हळू अंधार.

धैर्याची गोड फळं !

१९ ऑक्टोबर हा पीडीए चा वर्धापन दिन ! त्यात २०१० चा हा वर्धापन दिन चक्क ५९ वा वर्धापन दिन. पीडीए ने साठाव्या वर्षात पदार्पण केलं. ह्यावेळेला हा दिवस उल्हासात साजरा करत हे व्हावं अशी आमच्या “श.कु.” काकांची खूप इच्छा होती. (माहिती नसलेल्यांसाठी – श.कु. म्हणजे शशिकांत कुलकर्णी)

गणेशोत्सवात सादर केलेलं सख्खे शेजारी हे नाटक म्हणजे करमणूकीचा खजिनाच ! त्यामुळे हे नाटक आपण सादर करू असं त्यांच्या मनात फार होतं. अर्थातच सर्व कलाकारांना गम्मत येते असं नाटक पुन्हा पुन्हा व्हावं असं वाटत राहातं तसं सख्खे शेजारीच्या आमच्या कलाकारांना (म्हणजे रंगमंच /प्रयोग व्यवस्थेतील पडद्यामागच्या कलाकारांसहित) हा प्रयोग जरूर व्हावा असंच वाटत होतं.

पण ह्या प्रयोगासमोरही अनंत अडचणी होत्याच.

शकुकाका पोलंड दौर्‍यावरून परत आले तीन ऑक्टोबर ला आणि ह्या प्रयोगाच्या हालचाली खर्‍या अर्थाने सुरू झाल्या.

दरम्यानच्या काळात दिग्दर्शक प्रदीप हा “नेक्रोपोलिस” आणि “तिची सतरा प्रकरणे” ह्या नाटकांच्या तालमी तसंच, “जंगलनामा” च्या दिल्ली दौर्‍यासाठी जाणं (आणि त्या नाटकांच्या काही अडचणींमुळे – आत्ताच जाणं ..) आवश्यक होऊन बसलं होतं. त्यामुळे प्रदीप पुन्हा एकदा सख्खेच्या प्रयोगाला नाही म्हणून नटमंडळी चिडू लागली. (किंवा रुसू लागली म्हणूया ..) त्यातच काही नटांच्या परिक्षा सुरू झाल्या किंवा होणार आहेत हे जाहीर झालं .. आणि या सगळ्यावर कडी झाली ती साधारणपणे बारा तारखेच्या सुमारास हे (पक्कं) कळलं तेव्हा .. की श्रद्धा देशपांडे हा प्रयोग करू शकत नाही आहे. वास्तविक .. मूळ नटसंचात काही माफक तालमी होऊन प्रयोग चांगला होईल हा आत्मविश्वास आम्हाला होता .. चिकी (ऊर्फ विक्रांत ठकार ) याची साभिमान ईजिप्त देश यात्रा (झिम्मड साठी) ही सुद्धा याच दरम्यान आली होती .. त्यामुळे दौर्‍यात लक्षात आलेल्या तांत्रिक तृटी दूर करण्याचं कामही नवीन हातांमधेच देणं भाग होऊन बसलं होतं. श्रद्धा ललित कला केंद्रात शिकलेली आणि भूमिका समजेने करत असलेली, नाटकातली फार महत्वाची अभिनेत्री होती .. पण ती आता नसणार .. मग दोन पर्याय होते .. एक तर १९ तारखेचा प्रयोग रद्द करणं किंवा मग श्रद्धा ऐवजी कोणीतरी ती भूमिका करणं .. ह्यानंतरच्या सर्व घुसळणीतून आम्ही सगळे गेल्यावर आमची गीतांजली जोशी ही ती भूमिका करणार हे नक्की झालं आणि सर्वांना हायसं वाटलं.

पण तिच्यापुढे दिव्य वाढून ठेवलं होतं. केवळ सात दिवसांपैकी पांचच दिवसांत तिला हे काम उभं करायचं होतं. तिची रेडिओ चॅनलवरची नोकरी (ह्या सणासुदीच्या मोसमात) सांभाळत हे करणं हे काही वेळा सगळ्यांचा थरकाप करणारं नक्कीच होतं.

पण ती उभी राहिली. त्या दिवशी प्रयोगाची परिणामकारकता तिच्या विशिष्ठ दिसण्यामुळे आणि भूमिकेचा बाज नीट पकडता आल्यामुळे उत्तमच राहिली असा एकंदर वृत्तांत आहे.

प्रयोग मुळात कमी तालमी आणि ज्या झाल्या त्या ह्या परिस्थितीत झाल्याने अगदी सर्वोत्तम वगैरे होऊ शकणं अभिप्रेत नव्हतं .. पण नेटका झाला .. (तांत्रिक घोळ होतेच ..)

आम्हाला हा प्रयोग झाल्या त्यापेक्षा चांगला होऊ शकला असता ही हुरहुर जरी लागली असली .. तरीही तो पीडीएच्या खूप खूप शुभचिंतकांच्या उपस्थितीत झाला हे महत्वाचं वाटत आहे.

हा लेख ह्यासाठी सफाई वगैरे देणारा लेख नाही ..

उलट आज साठाव्या वर्षात पदार्पण करताना .. पीडीएकडे अशी काही मंडळी अद्याप आहेत आणि नव्याने तयार होत आहेत की ज्यांना प्रतिकूल परिस्थितीत पीडीएची मान मरगळून जाता कामा नये ही ईर्षा मनात आहे.

सब्र का फल मीठा असं आपण म्हणतो .. धीरानं घेतलं की त्या धीराची गोड फळं चाखता येतात हा पायंडा आहेच ..

इथे असं झालं की आधी म्हणालेल्या ईर्षेमुळे धैर्यानं या परिस्थितीला शिंगावर घेतलं .. विशेषत: स्मिता, आशिष, काका आणि गीतांजली ने .. सोबत अमृता आणि इतर नटमंडळी होतीच ..
पण ह्या धैर्याची फळं गोड मिळाली हे उत्तम ..

पीडीएच्या साठा उत्तराची कहाणी सुरू झाली आहे .. अगदी हसत खेळत आणि .. ती मनात होती त्या प्रकारे सुरू करू शकल्याचं स्मित शकुंच्या चेहर्‍यावर घेऊन …

ही कहाणी या वर्षी नाट्यक्षेत्रातल्या इतर अनेकांच्या चेहर्‍यांवर स्मित फुलवण्यासाठी समृद्ध होत जाईल .. नक्कीच !

« Older entries

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 30 other followers